बारामती लोकसभेच्या मैदानात ३८ उमेदवार! अपक्ष उमेदवारांचा कोणाला बसणार फटका?

बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल ३८ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत आहे.

    पाटस : बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल ३८ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत आहे तरीही ओबीसी आणि अपक्ष उमेदवारांचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला ? कोणाची मते कोण खाणार ? कोणाच्या मतावर कोणाचा डोळा! याची चांगलीच चुरस आता मतदारसंघात निर्माण झाली असून, राजकीय रणनीती आणि डावपेच आखले जात आहेत.

    बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, छाननी आणि चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. बारामती मतदारसंघात यंदा भाजप प्रणित महायुतीने खासदार सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पराभव करण्यासाठी खुद्द पवार यांच्या घरात फूट पाडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले आहे. भाजपने त्यासाठी अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांची शिकार करण्याची राजकीय रणनीती आखली आहे.

    अर्थात हे राजकीय डावपेच, राजकीय रणनीती आणि विजयी होण्यासाठी राजकीय गणिते सर्वच राजकीय पक्ष आखत असतात. हा एक त्यातलाच राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुळे विरुद्ध पवार अशी अशी लढत होणार असून चांगलीच चुरश निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

    तसेच बारामती मतदारसंघात मराठा – ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्याने उदयास आलेल्या ओबीसी बहुजन पार्टी ने दौंड विधानसभा मतदारसंघातील ओबीसी चेहरा महेश भागवत, बहुजन समाज पार्टीकडून प्रियदर्शनी कोकरे, शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले, कल्याणी वाघमोडे यांच्यासह तब्बल ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

    महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात प्रमुख लढत मानली जात असली तरीही अपक्ष उमेदवारांनी या दोघांची डोकेदुखी वाढवली आहे तर दुसरीकडे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत हे भटक्या विमुक्त, ओबीसी एस सी एस टी त्यांच्या मतावर दावा करत आहेत. मात्र बारामती मतदारसंघात ३८ उमेदवारांमध्ये ओबीसी समाजाचेच उमेदवार जास्त आहेत. त्यामुळे ओबीसी मतांची विभागणी होणार असून अपक्ष उमेदवार चांगले मते घेऊ शकतात. त्यामुळे या मतांचा फायदा नेमका कोणाला होणार ? कशी आखली गणिते आखली जातात, याकडे लक्ष लागले आहे.