pm narendra modi in mumbai

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

    मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Aapla Dawakhana) या योजनेतील 20 नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 7 मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या 3 रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील 400 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.(PM Narendra Modi In Mumbai) मेट्रोच्याही नव्या मार्गाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

    पंतप्रधानांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे, त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे.

    • मेट्रो – पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो 2 च्या नव्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना वेग आला. आता मुंबई मेट्रो 2च्या नव्या लाईनचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोच्या दोन नव्या लाईन 2 A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. मेट्रोची पहिली फेज गेल्या वर्षी सुरू झाली. लाईन 2 A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करेल. दोन्ही मेट्रो लाईनची लांबी 35 किलोमीटर आहे. एलेव्हेशन स्टेशनची संख्या 30 आहे.दोन्ही लाईनने रोज सुमारे 25 हजार लोकं प्रवास करतात. या लाईनसाठी सर्व मेट्रो कोच भारतात बनविण्यात आले आहेत. या दोन्ही मेट्रो लाईनचा खर्च सुमारे 12 हजार 600 कोटी रुपये आहे.
    • मलजल प्रक्रिया केंद्र – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे.
    • रस्ते काँक्रिटीकरण – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रस्ते काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामांसाठी अंदाजे रु. ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सुरु होणारे हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे.
      या कामांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागात ७२ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.या रस्त्यांच्या कामांत ‘युटिलिटी डक्ट’ तसेच पूर नियंत्रणात महत्वाचे ठरणारे शोष खड्डेही बनवले जाणार आहेत. या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बनवण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना हे काम दिले जाणार आहे. नवीन रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा यासाठी दर्जेदार व्यवस्थापन संस्थाही देखभालीसाठी नेमण्यात येणार आहेत.
    • प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) – कोविड १९ आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही (PM SVANidhi) योजना सुरू करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराडजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ मिळणार आहे. या कर्ज वाटपाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात येणार आहे.
    • रुग्णालये आणि दवाखाने

    1. भांडुप मल्टीस्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय, नाहूर 

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील नाहूरगांव येथे ३६० रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तब्बल ७१,५४७.६६ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ९ मजले यानुसार एकूण ११ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त १० मजल्यांची कर्मचारी निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०३ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ देखील असणार आहे.
    या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३६० रुग्णशय्यांपैकी १९० रुग्णशय्या ह्या वैद्यकीय शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, प्रसूति, ट्रॉमा, बालरोग, नवजात शिशू, कान-नाक-घसा, नेत्ररोग व अपघात यासाठी असणार आहेत. ३० अतिदक्षता रुग्णशय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. १०० अतिविशेष सर्वसाधारण रुग्णशय्या ह्या न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कर्करोग व पोटाचे विकार यासाठी असणार आहेत. तर उर्वरित ४० रुग्णशय्या ह्या ‘अतिविशेष अतिदक्षता’ यासाठी असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त शल्यचिकित्सा गृहांमध्ये १३ रुग्णशय्या असणार आहेत.
    2.सिद्धार्थ महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, गोरेगांव (पश्चिम)
    बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगांव (पश्चिम) परिसरात असणाऱ्या सिद्धार्थनगरमध्ये ३०६ रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ५०,१३९ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त २० मजल्यांची निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०८ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ देखील असणार आहे.

     3.ओशिवरा प्रसूतिगृह, ओशिवरा गांव
    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील ओशिवरा गांव परिसरात असणाऱ्या भूखंडावर १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसूतिगृहाचे      भूमिपूजन भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १३,५०५.१५ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे प्रसूतिगृह तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. यापैकी १० व ११ वा मजला हा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी असणार आहे. तसेच या प्रसूतिगृह परिसरात पुरेशा संख्येने वाहने उभी राहतील असे वाहनतळ देखील असणार आहे.
    4. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
    भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दवाखान्यांचे लोकार्पण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजने अंतर्गत करण्यात आले होते. याच योजने अंतर्गत आता २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत २ लाख १० हजार रुग्णांवर आवश्यक ते वैद्यकीय ओषधोपचार करण्यात आले आहेत. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन व औषधोपचार यासह विविध १४७ चाचण्या (Radiology, Pathology) मोफत उपलब्ध आहेत.

    या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मान्यवर लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांनी दिली आहे.