चाकूने वार करुन फरार झालेल्या ४ जणांना अटक; मुंढवा पोलिसांची कारवाई

मोबाईल हिसकावताना प्रतिकार केल्यानंतर तरुणावर चाकूने वार करून पसार झालेल्या चार सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

    पुणे : मोबाईल हिसकावताना प्रतिकार केल्यानंतर तरुणावर चाकूने वार करून पसार झालेल्या चार सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. याघटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. चाकूने वार केल्यानंतर चौघे त्याचा मोबाईल घेऊन पसार झाले होते.

    सारंग उर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड (वय १९), ऋषीकेश उर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे (वय २३), अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड आणि हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड (वय २१, रा. सर्व. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम, संतोष जगताप, हेमंत झुरंगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    तक्रारदार तरुण पायी चालत जात असताना रिक्षातून आलेल्या चौघांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावला. परंतु, तरुणाने त्याला प्रतिकार केला. तेव्हा आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या हातावर चाकूने वार करून मोबाईल घेऊन आरोपींनी पळ काढला होता. मुंढवा पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात होता. या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. माहिती घेत असताना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    चौघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सारंग उर्फ साऱ्या याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. तर, ऋषीकेश उर्फ भोऱ्या याच्यावर ५ तसेच अभिषेकवर दोन व हेमंत उर्फ लाल्या याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.