बारा वर्षांपासून राहणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना पकडले; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे शहरात गेल्या बारा वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. बुधवार पेठेत शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

    पुणे : पुणे शहरात गेल्या बारा वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. बुधवार पेठेत शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी फरासखाना पोलिसांत पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मासुका कलाम फकीर उर्फ शेख (२५, रा. बुधवार पेठ, मूळ. रा. बांगलादेश), पिया नाझ्मुल सरदार उर्फ शेख (२७, बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश), रुजी हारून शेख (३८, रा. बांगलादेश), रूपा आकाश मंडोल (४०, रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

    ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने केली.

    आरोपी महिला मागील १२ वर्षांपासून बुधवार पेठेतील लिंगप्पा महांकाळे यांचा जुना वाडा येथे शिवा कांबळे यांच्या ताब्यातील तळमजल्यावरील खोलीत राहत होत्या. बुधवार पेठ भागात बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने शनिवारी बुधवार पेठ भागात छापा टाकला.

    येथून ९ महिलांना ताब्यात घेतले. यात ४ महिला या बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले. चौकशी केली असता त्यांच्याकडे वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांच्यावर फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    इतर पाच महिलांवर गुन्हा

    वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यावर उभे राहून अश्लील हावभाव व हातवारे करून सार्वजनिक ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा केल्याप्रकरणी ५ महिलांना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.