यशोगाथा! एक एकर ऊसातून कमावले ४ लाख ८३ हजार ; पणदरेतील शेतकरी संजय जगताप यांचे विक्रमी उत्पादन

पूर्वीची केळीची बाग ॲड संजय जगताप यांनी काढून टाकली, त्याच शेतात ७ फुटी पट्टा काढून ८६०३२ या उसाच्या जातीची ४२०० रोपे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून आणली. प्रत्येक रोपांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले. उसाची बांधणी, तगारणी यासाठी योग्य नियोजन केले, उस १० ते १२ कांड्यावर व २० ते २२ कांड्यावर झाल्यावर उसाचे २ वेळा पाचट काढले.

  शिवनगर : माळेगाव साखर कारखान्याचे सभासद ॲड. संजय यशवंत जगताप (रा. पणदरे, सोनकसवाडी) येथील प्रगतिशील शेतकऱ्याने एक एकरामध्ये १३८ टन विक्रमी उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा सत्कार माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी केला.
  अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. परंतु जिद्द-चिकाटी-मेहनत आणि काळ्या मातीशी ठेवलेले नाते हे यशाचे गमक आहे, त्यामुळे फक्त एक एकरामध्ये उच्चांकी १३८ उत्पादन घेण्यात जगताप कुटुंबीय यशस्वी झाले आहे. कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थितीला शेतकरी सामोरा जात आहे, त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. शेती परवडत नाही, अशी परिस्थिती आज सगळीकडे दिसत आहे; मात्र जर योग्य नियोजन केले, पाणी-खते व योग्य जोपासना केल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर-सांगली या ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांपेक्षा मेहनतीच्या जोरावर भरघोस उत्पादन घेऊ शकतो.
  पूर्वीची केळीची बाग ॲड संजय जगताप यांनी काढून टाकली, त्याच शेतात ७ फुटी पट्टा काढून ८६०३२ या उसाच्या जातीची ४२०० रोपे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून आणली. प्रत्येक रोपांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले. उसाची बांधणी, तगारणी यासाठी योग्य नियोजन केले, उस १० ते १२ कांड्यावर व २० ते २२ कांड्यावर झाल्यावर उसाचे २ वेळा पाचट काढले. ज्यावेळी ऊस ४० ते ५०  कांड्यावर आला, त्या वेळेला कारखान्याने हा परिपक्व झालेला तोडून नेला. ऊसाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व रासायनिक खते देण्यात आली. ॲड. संजय जगताप हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पुणे येथे वकिली व्यवसाय करतात, त्यांची दोन्ही मुले धीरज व तेजस यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नियोजन करून उसाचे भरघोस उत्पादन घेतले.

  जगताप यांच्या मुलांना शेतीची आवड
  जगताप यांच्या दोन्ही मुलांना शेतीची आवड असल्यानेे ते सतत शेती विषयी माहिती घेत असतात. त्यातूनच त्यांना माळेगाव कारखान्याचे कृषीनिष्ठ संचालक योगेश जगताप, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे व कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्याचे धीरज व तेजस जगताप यांनी सांगितले.

  धीरज व तेजस या दोन्ही भावांनी एकरी १३८ टन उच्चांकी ऊस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलेला आहे. येथून पुढे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येईल. त्यामुळे शेतकरी सुजलाम आणि सुफलाम होईल.

  - योगेश जगताप (संचालक माळेगाव साखर कारखाना माळेगाव).