एटीएममधून चार लाखांची रोकड चोरली, कॅम्प भागातील घटना; अज्ञातांवर गुन्हा दाखल

कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता तसेच आझम कॅम्पस येथील एटीएमध्ये तांत्रिक छेडछाड करुन चोरट्यांनी तब्बल ४ लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

    पुणे : कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता तसेच आझम कॅम्पस येथील एटीएमध्ये तांत्रिक छेडछाड करुन चोरट्यांनी तब्बल ४ लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून त्यांनी रोकड चोरली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापक रज्जाक इनामदार (वय ५४, रा. बाणेर ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता आणि आझम कॅम्पस भागातील हिदायतुल्ला रस्त्यावर द मुस्लीम को-ऑप बँकेचे एटीएम केंद्र आहे. चोरट्यांनी एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करुन वेळोवेळी चार लाख ८ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. एटीएम व्यवहाराची नोंद झाली नव्हती. मात्र, एटीएमधील रोकड कमी असल्याचे निदर्शनास आले होते.

    एटीएममधून रोकड चोरीला गेल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करुन रोकड चोरल्याचे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले आहे. चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक पाटील तपास करत आहेत.