सांगलीत ४० हजार एकर द्राक्षबागा उद‌्ध्वस्त! सलग तिसऱ्या वर्षी नुकसान; घडकूज, मणी गळ, द्राक्ष मण्यांना तडे

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ८० टक्के द्राक्ष बागा उद‌्ध्वस्त झाल्या आहेत. ८० हजार एकर क्षेत्रापैकी, ५६ हजार एकरहून अधिक द्राक्षबागांचा आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे.

    प्रवीण शिंदे, सांगली : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ८० टक्के द्राक्ष बागा उद‌्ध्वस्त झाल्या आहेत. ८० हजार एकर क्षेत्रापैकी, ५६ हजार एकरहून अधिक द्राक्षबागांचा आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांत घड़कूज आणि मणी गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मऊ होऊ लागलेल्या द्राक्षांना तडे गेले आहेत. बागांच्या नुकसानीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या नुकसानीने द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे. जिल्ह्यात ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. दोन वर्षांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागायतदार कर्जाच्या खाईत लोटला आहे.

    यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने टेचाईचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने द्राक्षबागा फुलवण्यासाठी जिवाचे रान केले. यावर्षी हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, गेल्या आठवडाभरातील खराब हवामान आणि अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी कोलमडून गेला. विशेषत: तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उ‌द‌्ध्वस्त झाला आहे. सप्टेंबरपूर्वी आगाप फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागेत अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार झालेली असताना देखील या द्राक्षांचा चिखल झाला आहे.फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागात अवकाळी पावसामुळे घटकूज आणि मणीगळ झाली आहे. या अवस्थेतील बागा उद‌्ध्वस्त झाल्या आहेत.

    तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टर)
    तासगाव – ९.२३६
    मिरज – ८,२६८
    जत – ६,९०६
    कवठेमहांकाळ महांकाळ – २,८७१
    पलूस – १, ५६१
    वाळवा – १,२१५
    खानापूर – १,१२५
    कडेगाव – २२९
    आटपाडी – ३६५
    एकूण – ३९.७७६

    औषध फवारणीसाठी लगबग
    गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे  औषध फवारणीसाठी लगबग सुरू असून बदलत्या वातावरणात द्राक्षे बागा जगिवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पादनाची हमी हरवलेली असताना महागडी औषधे शेतकरी रात्र दिवस न पाहता भर पावसात फावरत आहेत. बागेत चिखल निर्माण झाल्याने ट्रॅक्टर औषध मारणे मुस्किलीचे बनले आहे. औषध फवारणीचे ट्रॅक्टर अडकल्यानंतर त्यास ओढून काढण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पुन्हा पावसाचे चिन्ह असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

    जिल्ह्यात पाऊस पडलेल्या तालुक्यामध्ये द्राक्षे बागांचे नुकसान आले आहे. द्राक्षे बागाच्या आलेल्या नुकसानीचे नजर अंदाज सर्वेक्षण सुरु झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन तत्परतेने काम करीत आहे.
    -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

    शेतकरी आधीच गेल्या तीन वर्षांपासून वतावरणामुळे ल अडचणीत आहेत, तत्पूर्वी लॉक डाऊनचा मोठा फटका बसला होता, सलग चार पाच वर्षे शेतकरी तग धरू शकणार नाहीत. याचा परिणाम फक्त बाजारपेठ नाही, तर शेतकऱ्यांच्या मानसिकता आणि कुटुंबावर देखील होत आहे. त्यामुळे फक्त पंचनामे नकोत, आता शेतकऱ्याला मदत मिळाली तरचं शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार आहे.

    -राहुल पाटील, द्राक्ष उत्पादक, वायफळे (ता. तासगाव)