लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल मागे चारशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    लासलगाव :  देशामध्ये सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहेत. सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याला मालाच्या हमीभावासाठी लढा उभा करावा लागत आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन देखील सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील शेतमालाला मिळणार कमी भाव याची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर कांदा निर्यात बंदी पूर्णपणे उठवली गेली नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेत अटी शर्तीनुसार तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात केले जाणार असल्याचे जाहीर केले. यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात 400 ते 600 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. मात्र केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने 31 मार्चपर्यंत कांद्याची निर्यात बंदी कायम असल्याचा खुलासा केल्यानंतर आज मंगळवारच्या तुलनेत बुधवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल मागे चारशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    सरकारच्या या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांबरोबरच कांदा व्यापारी देखील या सतत बदल असणाऱ्या कांदा निर्यात धोरणांमुळे हैरान झाले आहे. आधीच अवकाळी पाऊस, हमीभावाचा अभाव यामुळे शेतकरी वैतागलेला आहे. त्यामध्येच आता सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.