आंबेगाव तालुक्यातील 405 अंगणवाड्या बंद; सेविका, व मदतनीस बेमुदत संपावर

आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सोमवार (दि. ४) पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून ४०५ अंगणवाड्या बंद आहेत.

    पुणे : आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सोमवार (दि. ४) पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून ४०५ अंगणवाड्या बंद आहेत. वय तीन ते पाच वयोगटातील पाच हजारपेक्षा जास्त बालके शिक्षण व पोषण आहारापासून वंचित आहेत.

    पेठ (ता. आंबेगाव) येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बैठक विमल खेडकर, विद्या थोरात, नंदा कराळे, अलका भोर, मंदाकिनी होनराव, अर्चना इंदोरे, कविता कराळे, विद्या तोत्रे यांच्या उपस्थित झाली.

    यावेळी झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्या शारदा शिंदे, विमल ढमाले, इंदुमती शिंदे यांची मनोगते झाली. त्या म्हणाल्या “सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. अनेक मोबाईल बंद पडलेले आहेत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने मानधनामध्ये वाढ केलेली नाही. पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा विचार शासनाने मागे घ्यावा, पोषण टॅकर अॅप मराठीत व्द्यावे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भराव्यात, पदोन्नतीला प्राधान्य द्यावे, दरवर्षी दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस द्यावा.

    शासनाने तोडगा काढावा

    गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. शासनाने ताबडतोब तोडगा काढावा.’ असंही यावेळी त्या म्हणाल्या.