संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळ्याच्या मार्गक्रमणात ४२ गुन्हेगारांना अटक

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायच्या गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि युनिट तीन यांनी धडाकेबाज कारवाई करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळ्याच्या मार्गक्रमणात 42 गुन्हेगारांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायच्या गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि युनिट तीन यांनी धडाकेबाज कारवाई करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळ्याच्या मार्गक्रमणात 42 गुन्हेगारांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  अधिक माहिती देताना अंकुश शिंदे म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळ्याच्या मार्गक्रमणाच्या वेळी परराज्यातून आलेल्या भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र चोऱ्या, चैन चोरी व पाकिटमारीच्या घटना दरवर्षी घडतात. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आयुक्त, अपर पोलिस आयुक्ता संजय शिंदे, पोलिस उपआयुक्त(गुन्हे) काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त(गुन्हे) पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, युनिट-1 व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकरराव बाबर, युनिट-1 यांच्या नेतृत्वात स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

  या पथकाने 21 जूनला राजस्थानी गुन्हेगारी बगरिया टोळीतील 4 आरोपींना गुन्हे करण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांना ताब्यात घेत संभाव्य गुन्हे घडण्याआधीच कारवाई केली. दरम्यान, चिखली पोलिस ठाण्यामधील गुन्ह्यातील आरोपी प्रेम बामनाईक याला सुद्धा ताब्यात घेऊन चिखली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. असे एकूण 85 संशयित व्यक्तींना चेक करून त्यापैकी 12 जणांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 68, 69 प्रमाणे कारवाई करण्यात आली, तर 9 जणांवर कलम फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 109 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

  22 जूनला पालखी मार्गक्रमाणादरम्यान संशयित एकूण 26 पुरुष व 11 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दिघी आणि आळंदी पोलिस ठाणे येथे दाखल 12 गुन्ह्यापैकी सर्वच 12 गुन्हे उघड करण्यात यश मिळाले. यामध्ये 4 महिलांना व 2 पुरुषांना रंगेहात पकडण्यात या विभागास यश मिळाले आहे. त्यांना साथ देणाऱ्यांना सुद्धा पकडून त्यांच्याकडून एकूण 2.50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 40,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

  बालगुन्हेगारी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळींवर नियंत्रण आणण्याचे आव्हाने

  पोलिसांसमोर बालगुन्हेगारी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळींवर नियंत्रण आणणे असे दोन आव्हाने आहेत. ही माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले की, “बालगुन्हेगारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय हद्दीत वाढत आहे. जी एक चिंतेची बाब आहे. बालक गुन्हेगारीत शामिल होऊ नयेत अशी माझी भावना आहे. आम्ही सर्व विधिसंघर्षित बाळाकांची माहिती काढतोय. आम्ही त्यांच्या पालकांना भेटून त्यांचे प्रबोधन करणार. तसेच, त्या परिसरातील इतर पालकांना त्यांच्या मुलामुलींवर लक्ष ठेवायला सांगणार. शहरात बऱ्याच ठिकाणी काही टोळ्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करतात. त्यांना नियंत्रणात आणणे हे दुसरे आव्हान आहे.