शिरोळ तालुक्यातील ४३ कोटीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू होणार; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

शिरोळ तालुक्यातील सध्या २२ गावांमध्ये जवळपास ४३ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेंच्या कामाला काही दिवसातच सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

    जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन अनेक वर्ष अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, तर काही गावांमध्ये नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेंची कामे लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, या सर्व योजनांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश केला असल्यामुळे योजनांची रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. तालुक्यातील सध्या २२ गावांमध्ये जवळपास ४३ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेंच्या कामाला काही दिवसातच सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

    पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन सचिव संजीव जयस्वाल, जीवन प्राधिकरणचे अभिषेक कृष्णा, कोल्हापूर जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे व या विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी या बैठकीला हजर होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही सर्व कामे वेगाने पूर्ण होत आहेत त्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    सध्या लाटवाडी गावासाठी ९१ लाख ६७ हजार इतक्या खर्चाच्या योजनेची वर्क ऑर्डर निघाली असून तेथील कामाची लवकरच सुरुवात होत आहे, घालवाड – १ कोटी ६७ लाख, राजापूर – १ कोटी २ लाख ६५ हजार या गावासाठींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत, तर उर्वरित मजरेवाडी – १ कोटी ४७ लाख ७१ हजार, खिद्रापूर- १ कोटी ७९ लाख ३२ हजार, चिंचवाड – १ कोटी ४१ लाख ८० हजार, टाकवडे-  १कोटी ०७ लाख ४६ हजार, शेडशाळ-  ५८ लाख ३७ हजार, आलास – १ कोटी ७४ लाख १२ हजार, गणेशवाडी- १ कोटी ४६ लाख ८२ हजार, टाकळीवाडी- १ कोटी ८७ लाख ३० हजार, शिरदवाड- ४ कोटी २५ लाख, शिवनाकवाडी -३ कोटी, कोंडीग्रे -२ कोटी ४५ लाख ९४ हजार, दानोळी- ४ कोटी ६२ लाख ४८ हजार, कवठेसार – १ कोटी १२ लाख ०९ हजार, अब्दुललाट – १ कोटी ९७ लाख, कनवाड- ६१ लाख ११ हजार, जैनापुर-  २ कोटी ३२ लाख ०१ हजार, चिपरी – ४ कोटी ६१ लाख १२ हजार, तमदलगे – २ कोटी १९ लाख ३५ हजार, व गौरवाड – ९६ लाख १८ हजार या वरील सर्व गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होत असून त्या सर्व गावातील योजनांची कामे लवकरच वेगाने सुरू होतील असेही यड्रावकर यांनी म्हंटले आहे.

    निमशिरगाव, तेरवाड, यड्राव व नांदणी या गावातील पाणीपुरवठा कामासंदर्भात तयार केलेली अंदाजपत्रके तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या सांगली व पुणे विभागाकडे पाठवलेली आहेत. लवकरच या गावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळेल आणि या चारही गावातील पाणीपुरवठा योजना सुरू होतील, असे यड्रावकर यांनी शेवटी सांगितले आहे.