मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानात ४३२ लाभार्थ्यांना लाभ

तळेगाव दाभाडे मंडलाधिकारी यांच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवण्यात आला. या अभियानात 432 जणांनी लाभ घेतला.

  पुणे/वडगाव मावळ : पुणे जिल्हाधिकारी, मावळ तहसीलदार यांच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे मंडलाधिकारी यांच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी म्हणजेच महसूल लोकजत्राचे आयोजन बुधवारी (दि.24) सोमाटणे तलाठी कार्यालय परिसरात करण्यात आले. 432 लाभार्थ्यांनी विविध दाखले तसेच लाभ घेतला.

  कार्यक्रमाचा शुभारंभ तळेगाव दाभाडे मंडलाधिकारी बजरंग के. मेकाले व मंडल मधील सर्व तलाठी यांचे हस्ते करण्यात आला. मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कार्यक्रमाला भेट देत उपस्थित लाभार्थी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले नागरिकांना विविध दाखले व लाभासाठी मावळ तहसील, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जनतेला एकाच ठिकाणी सर्व दाखले दिले जात असल्याने त्यांचा वेळ व पैसा वाचत आहे. 432 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. योग्य नियोजन केले आहे.”
  महसूल लोकजत्रे अंतर्गत नागरिकांना तहसील कार्यालय मावळ मधील विविध विभागांमार्फत पुढील प्रमाणे लाभ देण्यात आले.
  1)नागरिक सुविधा केंद्र – उत्पन्न दाखले व विविध दाखल्याची अर्ज स्वीकृती -72, 2)पुरवठा विभाग- दुबार शिधापत्रिका नावे कमी जास्त करणे -63
  3) निवडणूक विभाग – नवीन, दुरुस्त व मतदार यादीतील नाव कमी -72
  4)आधार कार्ड -दुरुस्ती व नवीन – 42
  5) संजय गांधी व श्रावण बाळ योजना अर्ज स्वीकृती – 12
  6)मंडल अधिकारी कार्यालय – विविध दाखल्यांचे अहवाल, फेरफार निर्गत -37
  7) तलाठी कार्यालय- तलाठी उत्पन्न अहवाल, 7/12 , 8अ व फेरफार -134 एकूण 432 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडलाधिकारी बजरंग के. मेकाले यांनी केले. सूत्रसंचालन सद्गुरु मुऱ्हे यांनी केले. आभार माजी आदर्श सरपंच राजेश मुऱ्हे यांनी केले.
  कार्यक्रमास सोमाटणे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडलाधिकारी बजरंग के. मेकाले, तलाठी वैभव भुतेकर, कविता मोहमारे, भारत रुपनवर, पुनम रणवीर, सुजाता रच्चेवार, सुनीता पेरके, मंडल मधील सर्व कोतवाल व सहाय्यक वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.