nandurbar school news

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 44 शाळांना वादळाचा तडाखा बसला आहे. या शाळांवरील पत्रे आणि छप्पर उडून गेलं आहे.

  नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात झालेल्या वादळामुळे अनेक शाळांचं नुकसान झालं आहे. या वादळाचा तडाखा जिल्हा परिषदेच्या 44 शाळांना बसला आहे. या शाळांवरील पत्रे आणि छप्पर उडून गेलं आहे. शाळांचे पंचनामे होऊन आता महिना उलटत आला असला तरी शिक्षण विभागाकडून या शाळांची दुरुस्तीच होत नसल्याने ऐन पावसात विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावली आहे. (Nandurbar News)

  44 शाळांचे पंचनामे
  नंदुरबार जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्याने (Stormy Wind) थैमान घातलं. या वादळात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad School) अनेक शाळांचं नुकसान झालं. या शाळांवरील पत्रे आणि छप्परच या वादळात उडून गेलं. विशेष म्हणजे याबाबत दुसऱ्या दिवशी तातडीने जवळपास 44 शाळांचे पंचनामे झाले. सर्वच मुख्याध्यापकांनी शाळांच्या या दुरावस्थेबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवले. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे या शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने आता शाळा सुरु होऊन पंधरा दिवस होऊनही विद्यार्थ्यांना वर्ग खोल्याच नसल्याने व्हरांड्यात शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

  पावसाळा (Rainy Season) सुरु झाल्याने पावसाचं पाणी या व्हरांड्यात येत असल्याने विद्यार्थ्यांसमवेत शालेय साहित्य देखील भिजण्याची शक्यता आहे. मात्र एकीकडे शासनाकडे प्रकल्प राबविण्यासाठी पैसे असताना शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नसावा, ही दुर्देैवी बाब आहे. आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि शैक्षणिक नुकसान पाहुन अनेक ग्रामपंचायती या शाळांच्या दुरुस्तीसाठी पुढे सरसावल्या आहेत.

  शालेय पोषण आहार, शैक्षणिक क्रीडा साहित्य पुरवण्याचा ठेका, यासाठी राज्यभर ठेकेदारांवर कोट्यावधींचा निधी वितरित केला जातो. मात्र शाळांच्या बांधणी आणि दुरुस्तीची बाब शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. ही अवस्था जिल्हा परिषदेच्या 44 शाळांची असली तरी खासगी आणि विना अनुदानीत शाळांचे असे नुकसान पाहता आज हजारो विद्यार्थ्यांना वर्ग खोल्याविना उघड्यावर शिक्षणासाठी लढा द्यावा लागत आहेत. याकडे सरकारने तरी लक्ष द्यावे, इतकीच माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव ग्रामीण रुग्णालयात बांधण्यात आलेलं पोषण पुनर्वसन केंद्र पहिल्याच पावसात गळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे बालकांची गैरसोय झाली असून हलक्या दर्जाचे काम झाल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.