डिंभे धरणातून पाणी सोडल्याने ४५ गावांना फायदा ; आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

  मंचर : हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना फायदा होणार असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहीर ,ओढे, नाल्यांनापाणी कमी झाले होते. त्यामुळे येथील  शेती पिके सुकू लागली होती. या संदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याच्या सुचना केल्या. त्यामुळे शेतकर्याने समाधान व्यक्त केले आहे.

  आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारे हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा उजवा कालवा हा येथील शेती पिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. धरणाच्या उजव्या कालव्यावर मोठ्या प्रमाणावर गावे बागायती झाली असून या ठिकाणची शेती बारमाही बागायती झाली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे या परिसरातील शेती पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. तसेच अनेक पाणी योजनाही कमी झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती. या संदर्भात शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी तसेच आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे डिंभे धरणातुन पाणी सोडावे, याबाबत मागणी केली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्याने सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे.

  पिकांना जीवदान

  धरणाच्या उजव्या कावव्याला पाणी आल्याने सुकू लागलेली शेती पिकांना जीवदान मिळणार असून या ठिकाणच्या विहीरी,नाले ,ओढ्यांना पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्याचाच फायदा येथे शेतीबरोबरच जनावरांचा चारा पिके त्याचप्रमाणे जनावरांचे पिण्याचे पाणी व येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. एकंदरीतच यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे. या वर्षी पाऊस कमी झाला असून जून महिन्यापर्यंत पुढील पाच ते सहा महिन्याचा कालखंड अतिशय खडतर असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पाच ते सहा महिने पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना तसेच सरकारला करावे लागणार आहे. कारण उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून जनावरांच्या तसेच लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा लावणार  आहे. त्याचप्रमाणे जनावरांची चारा पिके व शेती पिके उपलब्ध पाण्यावर कशी जगवायची याबाबत ही नियोजन करावे लागणार आहे.

  चारा पिके घेणे गरजेचे

  एकंदरीत उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणावर सध्या चारा घेणे गरजेचे आहे. जेणेकरून उन्हाळ्यात आत्ता तयार करून साठवलेला चारा उपयोगात येईल. सध्या एकंदरीत पाणी सोडल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र पाण्याचे योग्य ते नियोजन शेतकरी, प्रशासनाला करावे लागणार आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर आणि दत्ता कोकणे यांनी दिली