वसईमध्ये ३४ व्या कला क्रीडा महोत्सवात ५५ हजार स्पर्धक सहभागी

महोत्सवात तिरंदाजी, स्केटिंग, रूबिक क्यूब स्पर्धा स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून कुस्ती आणि दहिहंडी या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील.

    वसई : ३४ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात ५५ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९९० पासून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव होत आहे. यंदा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस सणाचे औचित्य साधून, फिटनेस रन आयोजित करण्यात आली असून दक्षिण आफ्रिकेत ९० कि.मी.ची ‘कॉम्रेड रन’ पूर्ण करणारे वसईचे शिलेदार योगेश पाटील, प्रशांत चव्हाण, स्वप्नील पाटील आणि प्रमोद चौधरी हे कॉम्रेड रनर्स तसेच बॅसीन कॅथॉलिक बँकेचे संचालक सॅबी डायस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    २६ डिसेंबरला प्रमुख उद्घाटक म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी, ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थिती लाभणार आहे. यांच्यासह महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, आमदार क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, नारायण मानकर, रुपेश जाधव, प्रविण शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचे प्रणेते लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

    यावर्षी महोत्सवात तिरंदाजी, स्केटिंग, रूबिक क्यूब स्पर्धा स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून कुस्ती आणि दहिहंडी या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. यावर्षी ८ वर्षांखालील आणि ६० वर्षांवरील असे दोन नवीन गट जलतरण स्पर्धेत वाढवण्यात आले आहेत. अशी माहिती माझी महापौर प्रवीण शेट्टी आणि महोत्सवाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी दिली. यावेळी संतोष वळवीकर, माणिक दोतोंडे सर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.