भीमा नदीत मृत्यूतांडव, एकापाठोपाठ सापडले एकाच कुटुंबातील 5 मृतदेह, नगर जिल्ह्यातील ‘या’ गावचे रहिवासी

दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांत आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली आहे. असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. हे चार ही जण एकाच कुटुंबातील आहेत.

  पुणे – दौंड जवळील भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असल्याचे उघड झाले आहे. तसेच ते पिकप जीप किंवा इतर कोणत्यातरी वाहनाने प्रवास करताना नदी पात्रात पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे.

  मोहन उत्तम पवार ( वय ४८), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) अशी या मृतांची नावे आहेत. त्यांच्या सोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. हे सर्वजण निघोज (ता. पारनेर, जि.नगर ) येथील रहिवाशी आहेत. हे भटकंती करणारे हे कुटुंब मंगळवारी (दि १७) रात्री अकराच्या नंतर पिकअप जीप, छोटा हत्ती अशा किंवा इतर वाहनाने घरगुती साहित्य घेऊन निघोज या गावातून निघून गेले होते, अशी माहिती पारनेर पोलीसांनी दिली आहे.

  अपघात की घातपात ?
  शिरूर – चौफुला रस्त्यावर पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात १८ जानेवारीला एका महिलेचा व त्यानंतर २०,२१ व २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह टप्पा टप्प्याने आढळून आले होते. पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले. मात्र या कुटुंबासोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्यापही शोध लागला नाही. दरम्यान, ही आत्महत्या आहे की अपघात आहे की घातपात, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

  शोध मोहिमेसाठी पथक तैनात
  सोमवारी (दि २३) ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहिमेसाठी तैनात केली आहेत. या घटनेबाबत यवत पोलीस सखोल तपास करीत आहेत.

  कुटुंबाबाबत माहिती असल्यास यवत पोलिसांशी संपर्क साधा
  दरम्यान, पारनेर तालुक्यातील या कुटुंबातील व्यक्तींना पिकअप, छोटा हत्ती किंवा इतर वाहनाने त्यांना प्रवास करण्यासाठी घेतले होते का?. लिप्ट दिली होती काय?. त्यांना कोणी पाहीले होते काय ? किंवा याबाबत काही माहीती असल्यास यवत व पारनेर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.