कोल्हापुरातील ६ आमदारांची लढ्यात उडी ; राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देऊन आंदाेलनात सहभागी

राज्यात गावोगावी आमदार, खासदारांना प्रवेशबंदी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आमदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देऊन मराठा समाजाबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

    कोल्हापूर : राज्यात गावोगावी आमदार, खासदारांना प्रवेशबंदी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आमदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देऊन मराठा समाजाबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत कोल्हापूर शहरातील काँग्रेस कमिटीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार ऋतुराज पाटील आणि जयंत पाटील आसगावकर वगळता सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणासंबंधी सर्व आमदारांनी भूमिका जाहीर केली.

    कोल्हापूर शहरातील काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीला माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजीव बाबा आवळे, आमदार जयश्री पाटील उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा काँग्रेस आमदारांनी सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केल्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

    मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार शंभर टक्के अयशस्वी आहे. मराठा आरक्षणाची मागणी मुद्दाम प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न, राज्य सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला.दरम्यान, बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे चारही आमदार दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला. यावेळी सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत जिल्ह्यातील सहाही आमदार मराठा समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे जाहीर केले.

    राज्य सरकार गंभीर नाही
    राज्य सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप आमदार सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी केला. आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. केंद्राने आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला द्या, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.