वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने ७० लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात विविध टेलिग्राम आयडी धारकावर गुन्हा नोंद

वर्क फ्रॉम होम देण्याचे आमिष दाखवून टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन विविध चार्जेसच्या नावाखाली एकाची तब्बल ७० लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : वर्क फ्रॉम होम देण्याचे आमिष दाखवून टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन विविध चार्जेसच्या नावाखाली एकाची तब्बल ७० लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विविध टेलिग्राम आयडी धारक तसेच विविध बँक अकाउंटधारक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मुफफदल मोहंमद मामा ( वय ४८, रा. कोंढवा) यांनी तक्रार दाखल केली आहे.

    हा प्रकार २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा परिसरात रहाण्यास आहेत. राहते घरी असताना त्यांना मोबाईलवर रमय्या नावाच्या अनोळखी महिलेने संपर्क साधला. त्यांना टेलिग्राम ,व्हॉट्सअप व ईमेलच्या माध्यमातून आणखी काही जणांनी संपर्क साधून टास्क जॉबच्या माध्यमातून अल्पावधीत चांगल्या प्रकारे पैसे मिळतील असे सांगून त्यांचे विश्वास संपादन केला.

    त्याप्रमाणे सुरुवातीला कमी प्रमाणात गुंतवणूक करण्यास सांगून त्यावर मोबदला दिला गेला. अशाप्रकारे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आणखीन मोठ्या टास्कचे कमिशन दाखवून त्याना लाखो रुपये मिळतील असे सांगून तब्बल ७० लाख ३२ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवण्यास सांगितले. मात्र, याबाबत कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम न देता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक मीनल पाटील तपास करत आहे.