पुणे जिल्ह्यातील ७२ गावे धोकादायक; पण ‘या’ २३ गावांना दरडींचा धोका

पुणे जिल्ह्यात २३ गावांना दरडींचा धोका असल्याचे समोर आले होते. जीएसआयने यंदा नव्याने सर्वेक्षण केल्यानंतर दरड प्रवण गावांची संख्या ७२ पर्यंत गेली आहे.

  पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळण्याची दुर्घटना सन २०१४ मध्ये घडली होती. त्यानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये जिल्ह्यात २३ गावांना दरडींचा धोका असल्याचे समोर आले होते. जीएसआयने यंदा नव्याने सर्वेक्षण केल्यानंतर दरड प्रवण गावांची संख्या ७२ पर्यंत गेली आहे. यापैकी दोन गावांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे, तर उर्वरित ७० गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याचे सुचविण्यात आले आहे.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत कामांचा ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठड्यात राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माळीण दुर्घटना घडलेल्या आंबेगाव तालुक्यातच सर्वाधिक २३ गावे धोकादायक असल्याचे जीएसआयच्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे.

  मावळात १५, वेल्ह्यात दहा, मुळशी आठ, खेड सहा, जुन्नर आणि भोर तालुक्यात प्रत्येकी पाच असे एकूण सात तालुक्यांत ७२ गावे दरड प्रवण असल्याचे जीएसआयच्या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सन २०२० मध्ये करण्यात आलेल्या जीएसआयच्या सर्वेक्षणातील २३ गावांपैकी २० गावांचा समावेश असून, यातील मुळशी तालुक्यातील घुटके आणि भोर तालुक्यातील धानवली या गावांचे तातडीने स्थलांतर करण्याचे अहवालात नमूद केले आहे. उर्वरित ७० गावांत दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची म्हणजे संरक्षक भिंत बांधणे, पाण्याचा प्रवाह काढणे, झाडे लावणे किंवा तात्पुरत्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे अशी अनेक कामे सुचविण्यात आली आहे.

  “दरड प्रवण ७० गावांमधील सुरक्षात्मक, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपासणी करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार पीडब्ल्यूडीने आतापर्यंत ३५ गावांतील कामाचे प्रस्ताव पाठविले असून मागील २३ गावांपैकी अनेक गावांत प्रतिबंधात्मक कामे देखील पूर्ण केली आहेत”, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी म्हटले आहे.

  तालुकानिहाय धोकादायक गावे

  आंबेगाव : काळेवाडी एक, काळेवाडी दोन, जांभळेवाडी, पांचाळे खु., भगतवाडी खु. , तळपेवाडी, सारवली, आवळेवाडी, आसाणे, कुसरे खु., अडिवरे, काळवाडी, आंबरे, कुसरे बु., पासरवाडी, बोरघर, मेघोली, दिगड, बेंडारवाडी, साकेरी, कोलतावडे, दरेवाडी.

  मावळ : मालेवाडी, सांगिसे, लोहगड, वाडेश्वर, वाउंड, ताजे, शिलाटणे, कलकराय, फलाने, वेहेरवाडी, बोरज, भुशी, कुसावली, मोरमारेवाडी

  वेल्हे : टेकपोळे, आंबवणे, सिंगापूर, गर्जेवाडी, घोळ, गिवशी, मानगाव, धनगरवाडी, वाडघर, हरपुड.

  मुळशी : घुटके, गडले, विठ्ठलवाडी, हिवाळेवस्ती, वाजरकरवाडी, साई, झाडाचीवाडी, कलमशेत.

  खेड : नायफड, शेंद्रेवाडी, गडाद, सोनारवाडी, शिरगाव, गडदवाडी.

  भोर : धानवली, डेहणे, सोनारवाडी, नानावळे, जांभळेवाडी.

  जुन्नर : भिवडे खु., भिवडे बु., सोनावळे, हातविज, गंगाळधरे