अवघ्या ३५ गुंठ्यात ८ लाखांचे उत्पन्न; इंदापूर तालुक्यातील ‘या’ गावातून पेरूला देशभर मागणी

जिद्द, अथक प्रयत्नांना शास्त्रोक्त ज्ञानाची जोड असेल तर काळी आई भरभरुन उत्पादन देते, हे निमगाव (Nimgaon) केतकी (Ketki) येथील युवा शेतकऱ्याने जगाला दाखवून दिले आहे. अवघ्या पस्तीस गुंठे क्षेत्रातील पेरुच्या बागेने त्याला आठ लाखाचे उत्पन्न देत, त्याला लखपती केले आहे.

  इंदापूर : जिद्द, अथक प्रयत्नांना शास्त्रोक्त ज्ञानाची जोड असेल तर काळी आई भरभरुन उत्पादन देते, हे निमगाव (Nimgaon) केतकी (Ketki) येथील युवा शेतकऱ्याने जगाला दाखवून दिले आहे. अवघ्या पस्तीस गुंठे क्षेत्रातील पेरुच्या बागेने त्याला आठ लाखाचे उत्पन्न देत, त्याला लखपती केले आहे. सिद्धार्थ माणिक भोसले असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे.

  जारवी रेड जातीच्या वाणाची लागवड

  भोसले यांचे सराफवाडी येथे ३९ गुंठे क्षेत्र आहे. त्यापैकी दोन गुंठ्यात शेततळे, तर उर्वरित ३५ गुंठ्यांवर पाच वर्षांपूर्वी त्यांनी दोनशे रुपयाला एक अशा चारशे जारवी रेड जातीच्या वाणाच्या पेरूची लागवड केली. यंदा या बागेला चौथा भार आहे. यावर्षी किलोमागे ६० ते ७२ रुपयांपर्यंत पेरूला दर मिळाला असून, १४ ते १५ टन माल निघाला आहे.

  तीन लाखांच्या आसपास खर्च

  पेरू लागवडीसाठी शेणखत, भेसळ डोस, फोम, खुरपणी, मजुरी यांसह इतर स्वरूपाचा साधारणतः तीन लाखांच्या आसपास खर्च झाला. आठ ते साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. असं सिद्धार्थ भोसले म्हणाले.

  बागेत ७० टक्के सेंद्रिय खतांचा वापर

  बागेत तणनाशकाचा वापर करत नाही. पूर्णपणे शेताची मशागत शेतमजूर लावून करून घेतो. त्यामुळे चांगला फायदा होतो. पेरू बागेत ७० टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक खतांचा वापर केला आहे. त्यामुळे पेरूला आकर्षकपणा व गुणवत्ता आहे. इतर पेरुंच्या तुलनेत चांगला टिकाऊपणा आहे. पेरूच्या आंबट-गोड चवीमुळे पुणे, मुंबई, बडोदा, बंगळुरू, दिल्ली, गोवा बाजारात मागणी जास्त असल्याचे भोसले म्हणाले.

  महाराष्ट्रसह परराज्यातील शेतकऱ्यांची फळबागेस भेट

  भोसले यांच्या फळबागेस आजतागायत गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. बागेकरिता वापरलेली खते, शेतीचे व्यवस्थापन समजून घेतले आहे.

  ‘झायडेक्स’च्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

  दरम्यान, झायडेक्स सेंद्रिय औषध कंपनीचे मुख्य अधिकारी शेलेंद्र सिंग यांनी भोसले यांच्या फळबागेस भेट दिली. उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय व रासायनिक खतांमधील फरक व रासायनिक खतांमुळे शेत जमीनीवर होणारा परिणाम या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.