सांगली कौटुंबीक आत्महत्येप्रकरणी ८ सावकारांना अटक, कर्जासाठी त्रास दिल्यानं कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

मिरजेमधील म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली.

    सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची (Mass Suicide) धक्कादायक घटना घडली. त्या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणी 8 सावकारांना (8 moneylenders) ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी सांगली पोलिसांना मिळाली आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.

    मिरजेमधील म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. माणिक आणि पोपट या दोघांनी सावकारी पाशाला कंटाळूनच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. दोघा भावांनी सुरुवातील कुटुंबातील इतरांना विषारी द्रव्य पाजून त्यानंतर स्वत: विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले होते. त्यामुळे लगेच पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासणी दरम्यान पोलिसांना मृतदेहांशेजारी एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीच्या आधारेच पोलिसांनी कारवाई करत ८ सावकारांना अटक केली आहे.

    मृतकांची नावं –
    आत्महत्या केलेल्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), पत्नी रेखा माणिक वनमोरे (45), मुलगा माणिक आदित्य वनमोरे (15), मुलगी प्रतिभा माणिक वनमोरे (21), शिक्षक पोपट यल्लाप्पा वनमोरे (52), त्यांची पत्नी संगीता पोपट वनमोरे (48), मुलगा शुभम पोपट वनमोरे (28) आणि त्यांची मुलगी अर्चना पोपट वनमोरे (30) व आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (वय 72)