anganwadi sevika

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ग्रामीण भागातील 27 गावं समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये असलेल्या निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या 80 अंगणवाड्या मात्र जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात होत्या. गरीब गरजू मुलांच्या शिक्षणाचा पाया या अंगणवाडी मधून तयार होतो. त्याचप्रमाणे गरोदर माता, लहान मुलांचे सर्वेक्षणदेखील अंगणवाडी सेविकांकडून केलं जातं.

कल्याण ग्रामीण: कल्याण (Kalyan) ग्रामीण भागातील निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या एकूण 80 अंगणवाड्या या शहरी भागात वर्ग करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) उपमहापौर मोरेश्वर भोईर (Moreshwar Bhoir) यांनी 2016 पासून याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने आता अंगणवाडी सेविकांचे मानधन, अंगणवाड्यांच्या जागेचा, देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ग्रामीण भागातील 27 गावं समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये असलेल्या निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या 80 अंगणवाड्या मात्र जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात होत्या. गरीब गरजू मुलांच्या शिक्षणाचा पाया या अंगणवाडी मधून तयार होतो. त्याचप्रमाणे गरोदर माता, लहान मुलांचे सर्वेक्षणदेखील अंगणवाडी सेविकांकडून केलं जातं. मात्र ग्रामीण भाग दुर्लक्षित असल्याने अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा प्रश्न, अंगणवाडीच्या जागेचा प्रश्न ,देखभाल दुरुस्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना वारंवार तारेवरची कसरत करावी लागत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या 80 अंगणवाडी शहरी भागात वर्ग कराव्यात, अशी मागणी करत याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर अंगणवाडी सेविकांच्या या मागणीला यश आलं आहे.

उद्यापासून या भागातील 80 अंगणवाड्या या शहरी भागात वर्ग करण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याने आता अंगणवाडी सेविकांना भेडसावणारे प्रश्न निकाली निघतील, अशी अपेक्षा उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी उपमहापौर मोरेश्वर यांचे आभार मानले.

उपमहापौर मोरेश्वर भोईर पुढे म्हणाले की, महिला व बालविकास विभागाची एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पूर्व प्राथमिक तयारी केली जाते. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत काळजी घेतली जाते. लहान बाळांचे सर्वेक्षण अंगणवाडीच्या मदतनीस व सेविकांच्या माध्यमातून केलं जातं. 27 गावे महापालिकेत वर्ग झाली. मात्र निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे अंगणवाडीच्या जागा,त्यांची देखभाल दुरुस्ती,अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन अशा अनेक गोष्टी प्रलंबित होत्या. त्यामुळे 27 गावातील निळजे व आजदे अंतर्गत असलेल्या 80 अंगणवाडी शहरी भागात वर्ग कराव्यात अशी मागणी मी शासनाकडे केली होती.