
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते. त्याच वेळी गुन्हेगार असलेले शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (Crime Branch) गावठी दारूविरोधात कारवाई सुरु आहे. अशाच एका कारवाईची सध्या खूप चर्चा सुरु आहे. कारण शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा चक्क एक 82 वर्षांचे(82 Year Old Man Runs Liquor Shop) आजोबा चालवत होते.
औरंगाबाद शहरातील दगड गल्ली, कुंभारवाड्यात छापा मारून पोलिसांनी 1800 लिटर गावठी दारू आणि 400 लिटर दारू बनविण्याचे मिश्रण तसेच इतर साहित्य असा 6 लाख 42 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका 82 वर्षीय वृद्धाविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शंकर नारायण आचार्य (वय 82 वर्षे, रा. सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ, दगडगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते. त्याच वेळी गुन्हेगार असलेले शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेळके यांच्यासह उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार शेख हबीब, विजय निकम, संजय मुळे, संजय गावंडे, राजेंद्र साळुंके, अनिता त्रिभुवन आदींचे पथक आचार्यच्या घराजवळ गेले. दरम्यान पंचांना बोलावून घेत पथकाने त्यांच्या घरावर छापा मारला.
पोलिसांनी या कारवाईत एकूण पंधरा ड्रम दारू जप्त केली आहे. यात 50 लिटर मिश्रण असलेली 100 लिटरची स्टीलची टाकी, 1400 लिटर दारू ठेवण्यात आलेले 200 लिटरचे सात ड्रम, चारशे लिटर दारू असलेले 100 लिटरचे चार ड्रम, चारशे लिटर मिश्रण असलेले चार ड्रम, दोन लोखंडी शेगड्या (भट्ट्या), दोन सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, एक किलो सोडियम बायकार्बोनेट, गूळ, पावडरचे पाकीट, सहा किलो नवसागर, प्लास्टिकच्या बादल्या, टोपले, नरसाळे, गावठी दारूचे मिश्रण ढवळण्यासाठी साडेचार फूट लांबीचा बांबू असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचार्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो फार पूर्वीपासून गावठी दारूचा अड्डा चालवित आहे. त्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी याआधीदेखील छापा मारलेला आहे. वयाच्या 82 वर्षीदेखील आजोबांचे उद्योग थांबलेले नाहीत, असं म्हणावं लागेल.