88 riverside villages at risk of disease, contaminated water supply, the health department began work

नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या जवळपास ८८ गावांना पावसाळ्याच्या दिवसातील दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. या गावांची लोकसंख्या जवळपास ९५ हजार ३६७ इतकी आहे. दूषित पाण्यामुळे डायरिया, डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा सारखे आजार पसरतात. याला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावातील जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणी करण्यात येत आहे.

  गोंदिया : जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी, बाघ नदी, पांगोली नदी, चुलबंद नदी, गाढवी नदी व मध्यप्रदेशातील बहला नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या जवळपास ८८ गावांना पावसाळ्याच्या दिवसातील दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. या गावांची लोकसंख्या जवळपास ९५ हजार ३६७ इतकी आहे. पावसाळ्यात या गावात आजाराचा प्रसार होवू नये, याकरिता आरोग्य विभाग कामाला लागला आहे.

  जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य रोगग्रस्त गावांमध्ये वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गोंदिया तालुक्यातील १२ व तिरोडा तालुक्यातील १४, बाघ नदीच्या किनाऱ्यावर गोंदिया तालुक्यातील ६, आमगाव तालुक्यातील १३, सालेकसा तालुक्यातील ७, बहला नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गोंदिया तालुक्यातील १०, चुलबंद नदी किनाऱ्यावर असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील ७ व गाढवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे.

  पावसाळ्यात या नदींचा जलस्तर वाढतो. त्यामुळे नदीचे दूषित पाणी गावापर्यंत पाहोचते. हे दूषित पाणी अनेकवेळा पाणीपुरवठा स्त्रोतात जावून तो पाणी दूषित होते व संसर्गजन्य आजार पसरतो. त्यामुळे या नदी किनाऱ्यांवर असलेल्या ८८ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी , आरोग्य विभाग उपाययोजनेकरिता कामाला लागला आहे.

  पाण्याचे नमूने घेवून तपासणी सुरू

  दूषित पाण्यामुळे डायरिया, डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा सारखे आजार पसरतात. याला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावातील जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणी करण्यात येत आहे. दूषित पाणी आढळल्यास त्वरित ग्रामपंचायतला सूचना देऊन पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते. जेव्हापर्यंत पाण्याचे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत तेथील पाणी उपयोगात आणून नये, असे निर्देश देण्यात येत आहे. संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणण्यासाठी औषध रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहेत.

  पावसाळ्यात जलजन्य आजाराची शक्यता जास्त असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासह दूषित पाण्याचे नमुने घेवून तेथील पाणी पिण्यासाठी वापरात आणण्यात येवू नये, अशा सूचना यंत्रणेला केल्या आहेत. आरोग्य विभाग जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आले. त्यामुळे रोगराईचा उद्रेक थांबविण्यात नक्कीच विभागाला यश येईल.

  यशवंत गणवीर, आरोग्य सभापती जि. प.