म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या; विष प्राशन करून संपविले जीवन

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घरात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले.

    सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता.मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची (Suicide in Mhaisal) धक्कादायक घटना घडली. मिरजेपासून काही अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यावर घटना उघडकीस आली.

    माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घरात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

    मृतांची नावे –

    माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा).