पिंपरी- चिंचवडमध्ये ९ वाहनांची तोडफाड; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

‘आम्ही इथले भाई आहोत’, असे म्हणत तीन जणांनी नऊ वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास घडली. यातील आरोपींना पकडून त्यांची सांगवी पोलिसांनी धिंड काढली.

    पिंपरी : ‘आम्ही इथले भाई आहोत’, असे म्हणत तीन जणांनी नऊ वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास घडली. यातील आरोपींना पकडून त्यांची सांगवी पोलिसांनी धिंड काढली.

    रोहिदास तेलंग, प्रवीण म्हस्के आणि संतोष महेश माळी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रवीण कुंजीर (रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागरमधील काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन चौक यारस्त्यावर पार्क केलेल्या नऊ वाहनांची आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाच्या सहाय्याने आरडा-ओरडा करीत तोडफोड केली.

    त्यावेळी फिर्यादी प्रवीण कुंजीर हे आरोपींना अडविण्यासाठी आले असता ‘आम्ही इथले भाई आहोत’, असे म्हणत लोखंडी रॉड कुंजीर यांना मारला. मात्र, त्यांनी चपळाईने तो वार चुकविला. जर लोखंडी रॉड फिर्यादी कुंजीर यांना लागला असता तर त्यांचा जीवही गेला असता, हे आरोपींना माहिती असतानाही त्यांनी हा प्रकार केला.

    सांगवी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपी निष्पन्न केले. तसेच आरोपींना ताब्यात घेतले. पिंपळे सौदागर परिसरात आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.