एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ, विशेष न्यायालयाकडून मंजूरी

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

    मुंबई – अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्या केल्याप्रकरणी मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मंजूर केली.

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातच एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. सदर खटला एनआयए विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

    आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवासांची आवश्यकता असल्याचे एनआयएकडून न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केली असून तर चारजण अद्यापही फरार आहेत. ठोस आणि विश्वासार्ह पुरावे शोधण्यासाठी तपास यंत्रणेला वाढीव मुदतीची गरज आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसून यंत्रणेची दिशाभूल करत आहेत. परिणामी, मागील आठवड्याभरात २० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याचेही एनआयएने सांगितले. त्याला एनआयएच्या अर्जाला आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली.