मावळात ९० टक्के भात कापणी पूर्ण; कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांची माहिती

मावळ तालुक्यातील खरीप भातपिकाची कापणी सुमारे ९० टक्के पूर्ण झाली असून यावर्षी मावळ तालुक्यातील भात पिकाला अतिशय चांगला उतारा मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.

  तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील खरीप भातपिकाची कापणी सुमारे ९० टक्के पूर्ण झाली असून यावर्षी मावळ तालुक्यातील भात पिकाला अतिशय चांगला उतारा मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.

  मावळ तालुका हा खरीप भातपिक असलेला महत्वाचा तालुका असून या तालुक्यात यावर्षी सुमारे १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिक घेतले होते. यावर्षी मावळ तालुक्यात खरीप भातपिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अतिशय चागंला पाऊस पडल्याने भात पिक अतिशय चांगले आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी पडवळ यांनी सांगितले. यावर्षी मावळ तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने भात लावगडी केलेल्या होत्या. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने भाताचे पिक सर्वत्र चांगले आले आहे.

  हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल उतारा

  यावर्षी मावळ तालुक्यात सुमारे १२५ टक्के पाऊस पडला. तो भात पिकाला पोषक असल्याने यंदा भात पिक चांगले आले. यावर्षी भात पिकाला काही भागात हेक्टरी उत्पन्न ५० ते ५५ क्विंटल उतारा मिळलेला आहे. यंदा विक्रमी उतारा मिळत असल्याने शेतकरी वर्ग चागंलाच आनंदी व समाधानी आहे.

  शेतकऱ्यांना ‘अच्छेदिन’

  यावर्षी मावळ तालुक्यातील भात पिकाला अतिशय चांगला उतारा मिळत असल्याने आणि तालुक्यातील सर्व शेती विकास सोसायट्या २४ रुपये किलो या हमीभावाने भात खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छेदिन’ आले आहेत.