समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत तब्बल 900 अपघात; अपघात रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi ExpressWay) प्रवाशांसाठी नुकताच खुला झाला. या महामार्गावरून दिवसाला हजारो प्रवासी ये-जा करत असतात. शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi ExpressWay) प्रवाशांसाठी नुकताच खुला झाला. या महामार्गावरून दिवसाला हजारो प्रवासी ये-जा करत असतात. शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. हा रस्ता सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या 100 दिवसांत तब्बल 900 अपघात झाल्याची माहिती दिली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी झाले. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग तब्बल 701 किमी लांबीचा आहे. या महामार्गावर सहा लेन आहेत. हा महामार्ग 390 खेड्यांमधून जातो. महाराष्ट्रातील दहा जिल्हे या मार्गात येतात. समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र, या मार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे. महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभ्यासातून विशेष माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पहिल्या 100 दिवसांत म्हणजेच 20 मार्च 2023 पर्यंत तब्बल 900 अपघात झाले आहेत. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

समुपदेशन केंद्रे उभारणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि राज्य परिवहन विभागाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आढावा बैठक झाली. तत्पूर्वी वाहतूक उपायुक्त भरत काळसकर यांनी 500 किलोमीटरचा प्रवास करून एक्स्प्रेस वेची पाहणी केली. या बैठकीत एक्स्प्रेस वेच्या आठही एंट्री पॉईंटवर चालकांचे अनिवार्य समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघाताचा मुद्दा गाजला विधानसभेत

छत्रपती संभाजीनगर येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले. तर चालकासह 7 जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजला.