पीक विमा योजनेंतर्गत भरपाईसाठी ९६५ कोटींचा निधी; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पंतप्रधान पीक विमा योजनेतील पीक नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याची आगाऊ (अग्रिम) रक्कम वाटप करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेतील पीक नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याची आगाऊ (अग्रिम) रक्कम वाटप करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

    या विमा योजनेंतर्गत आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई मागणीचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यानुसार ९६५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, उर्वरित निधीही येत्या दोन आठवड्यात उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    चालू वर्षीच्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत पीक विमा योजनेतून भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार राज्यातील २४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    यापैकी १२ जिल्ह्यांमधील नुकसान भरपाईबाबत विमा कंपन्यांचा काहीही आक्षेप नाही. अन्य ९ जिल्ह्यांच्या बाबतीत अंशत: आक्षेप आहेत. या आक्षेपांच्या अपिलावर सध्या सुनावणी सुरु असून, यापैकी सात जिल्ह्यांमधील सुनावणी पूर्ण झाली आहे.

    पुणे, अमरावतीची सुनावणी बाकी

    पीक विम्याच्या अर्जासंदर्भात विमा कंपन्यांनी बीड, बुलडाणा, वाशीम, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आक्षेप नोंदविले आहेत. यापैकी पुणे व अमरावती या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्य सात जिल्ह्यांमधील सुनावणी पूर्ण झाली असल्याचेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

    राज्यातून पावणेदोन कोटी विमा अर्ज

    पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यातील १ कोटी ७० लाख ६७ शेतकऱ्यांनी एक रुपयांत पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. यासाठी राज्य सरकार ८ हजार १६ कोटी रुपयांचा पीक विमा हप्ता भरणार आहे. यापैकी पहिल्या हप्त्यापोटी ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये राज्य सरकारने भरले आहेत.