
पुण्यातील ड्रग्स प्रकरणात समोर आलेला कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील तसेच त्याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्याकडून नाशिकमधील त्या कारखान्यात महिन्याला दोनशे किलो एमडीचे (मेफेड्रोन) उत्पादन करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : पुण्यातील ड्रग्स प्रकरणात समोर आलेला कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील तसेच त्याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्याकडून नाशिकमधील त्या कारखान्यात महिन्याला दोनशे किलो एमडीचे (मेफेड्रोन) उत्पादन करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका किलोची किंमत १ कोटींच्या जवळपास असून, आता पोलिसांकडून त्यांनी नेमकी किती निर्मीती केली. तसेच, ते कोठे-कोठे विकले गेले, याचा तपास सुरू केला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटजवळ पुणे पोलिसांनी कारवाई करून तब्बल दोन कोटी १४ लाखांचे मेफेड्रोन पकडले. कारवाईत कॅन्टीन बॉय रौफ शेख व सुभाष मंडल यांना पकडण्यात आले. तपासात ललित पाटीलने हे ड्रग दिल्याचेही उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी ललितचे मोबाईल जप्त करत तपास केल्यानंतर त्याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक यांची नावे समोर आली.
मात्र, उपचार घेणारा कैदी ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाला. दुसरीकडे भूषण व अभिषेक हे देखील फरार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. नवव्या दिवशी पोलिसांना नेपाळ बॉर्डवरवरून भूषण व अभिषेक यांना पकडण्यात यश आले. परंतु, ललित मात्र फरारच आहे. त्याचा शोध सुरू आहे.
तत्पुर्वी पोलिसांच्या तपासात नाशिकमध्ये हे माफिया एमडीचे उत्पादन करत असल्याची माहिती समोर आली आहे. भूषण व अभिषेक हे या कारखान्याचे मॅनेजमेंट (कामकाज) पहात होते. त्यांच्याकडून हे ड्रग बनवून पुरवठा केला जात होता. एका महिन्याला जवळपास दोनशे किलोच्या जवळपास हे मेफेड्रोनचे उत्पादन करत असल्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हा कारखाना सुरू करण्यात आला आहे. यानूसार, गेल्या ९ महिन्यात त्यांनी दीड ते दोन हजार किलो मेफेड्रोन तयार केले आहे. मुंबई व पुणे पोलिसांच्या कारवाईत यातील दीडशे किलोच्या जवळपास मेफेड्रोन पकडले गेले आहे. त्यामुळे उर्वरित त्यांनी कोणाला विक्री केले किंवा त्याचे काय केले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
ड्रग डिलर पोलिसांच्या रडावर…
ललित पाटील ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत होता. त्यामुळे त्याच्याशी संपर्कात असलेले तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवरील सर्वच ड्रग डिलर रडावर आले आहेत. त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यातील काही ड्रग डिलची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, ते गायब असल्याचे सांगण्यात आले.
मेफेड्रोन उत्पादनाला लागतात ६ दिवस
मेफेड्रोनचे उत्पादन करण्यासाठी सहा दिवस लागतात. त्याला मोठी प्रोसेस असते. वेगवेगळी केमिकल एकत्रित करण्यात येतात. एक दिवस हे सर्व बर्फामध्ये ठेवले जाते. थोडेही काही कमी जास्त झाल्यास मेफेड्रोन खराब होते. नाशिकच्या त्या कारखान्यात आठवड्याला ५० किलोहून अधिक मेफेड्रोन तयार करण्यात येत होते. एक किलो मेफेड्रोन बनविण्यासाठी ६ ते ७ लाख रुपये लागतात. एमडी हे अमली पदार्थ सर्वाधिक पार्टीमध्ये वापरले जाते.