कल्याण शीळ रस्त्यावर चाललंय काय?; चक्क मोठ्या पाईपमधून नेली जातेय दुचाकी अन्…

कल्याण रस्ता वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jam in Kalyan) आता चर्चेचा विषय ठरलाय. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे त्रस्त काही दुचाकीस्वार जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने भल्या मोठ्या पाईपमधून (Vehicle in Pipeline) गाडी चालवत आहेत.

    कल्याण : कल्याण रस्ता वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jam in Kalyan) आता चर्चेचा विषय ठरलाय. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे त्रस्त काही दुचाकीस्वार जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने भल्या मोठ्या पाईपमधून (Vehicle in Pipeline) गाडी चालवत आहेत. तर दुसरीकडे घारिवली गावाजवळ लावण्यात आलेल्या डिव्हायरमुळे तब्बल एक किलोमीटरचा वळसा घालून पुन्हा गावाकडे यावे लागते. या विरोधात आज घारीवली ग्रामस्थांनी आंदोलन केले.

    कल्याण शीळ रस्त्यानजीक असलेल्या घारीवली गावातील नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत घारीवली गावाजवळ बांधण्यात आलेल्या डिव्हायडर विरोधात आंदोलन केले. कल्याण शीळ रोडवर घारिवली गावाजवळ डिव्हायडर बांधण्यात आला आहे. यापूर्वी घारीवली गावात जायला कट रस्ता होता. मात्र, आता डिव्हायडर बांधल्यामुळे ग्रामस्थांना गावाकडे वळण्यासाठी थेट कोळेगावाच्या दिशेने जावून पुन्हा मागे यावे लागते. त्यामुळे हा डिव्हायडर काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आज कल्याण शीळ रोडच्या एका बाजूला उभे राहून ग्रामस्थांनी आंदोलन करत चांगलाच संताप व्यक्त केला.

    यावेळी एमएसआरडीसीने गावात जायला डिव्हायडर छेदून पूर्वीसारखा रस्ता द्यावा, अशी मागणी घारीवली ग्रामस्थांनी केली. मानपाडा पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सात दिवसात यावर मार्ग निघेल, असं आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. तर दुसरीकडे कल्याण शीळ रोडवर सकाळ सायंकाळच्या सुमारास देसाई गाव, काटई नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडते.

    गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देसाई गाव परिसरात वाहतूक कोंडी झाली होती .या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही बहाद्दरानी चक्क विरुद्ध दिशेने दुचाकी नेल्या. इतकेच नव्हेतर कल्याण शीळ रोडवर असलेल्या देसाई गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाईपमधून दुचाकी चालवल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.