आंबेगाव तालुक्यात पसरली धुक्याची चादर; पिकांवर कीड रोगांच्या प्रादुर्भावाची शेतकऱ्यांना भीती

थंडीत चढ-उतार होत असताना आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून धुक्याची चादर पसरली आहे. सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण होतो. वाढलेली थंडी गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

  आंबेगाव : थंडीत चढ-उतार होत असताना आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून धुक्याची चादर पसरली आहे. सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण होतो. वाढलेली थंडी गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

  गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात ढगाळ वातावरणामुळे उकाडा तसेच मध्येच एक दोन दिवस थंडी असे संमिश्र वातावरण नागरिक अनुभवत आहेत .गेल्या काही दिवसापासून वातावरण सातत्याने बदलत आहे. अनेक भागात पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली, त्यानंतर आता तालुक्यातील अनेक गावांमध्ये पहाटेपासून धुके पडत आहेत, त्यामुळे साहजिकच पिकांवर दव पडत असल्याचे चित्र दिसून येते.

  तालुक्यात होत असलेल्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात चांगलाच घसरला होता. दिवसभर थंड वाऱ्यामुळे तालुक्यात थंडी जाणवते. दिवसभर हलका सूर्यप्रकाश दिसून येतो तर दिवसभर ढगाळ वातावरण आणि धुके असते. भारतीय हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस धुके पडण्याची दाट शक्यता असून, पारा घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  धुक्याचा परिणाम पीक वाढीवरही होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केले आहे .दरम्यान तालुक्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामातील बटाटा काढणी झाली असून, ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र गेले काही दिवस दाट धुक्यामुळे ज्वारीच्या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामातील कांद्याची देखील लागवड झाली आहे. कांद्याची लागवड होऊन सुमारे पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे, त्यामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडल्याने उत्पादनापेक्षा औषधे फवारणीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे शेती करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. टोमॅटो , वांगी, कोबी, गवार, कांदापात, कोथिंबीर, मेथी या पिकांवर करपा, बोकड्या, अकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी मांडली आहे.

  एकूणच आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामाच्या दृष्टीने सध्याचे वातावरण पिकांना पोषक नाही. सातत्याने पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना औषधे आणि पिकांवर करण्यात येणाऱ्या औषध फवारणीचा खर्च वाढत चालला आहे.