जप्त केलेल्या सायलेन्सर, हॉर्न्सवरुन फिरला बुलडोझर; सातारा वाहतूक शाखेची कारवाई

सातारा वाहतूक शाखेने शहरात फटाके फोडणार्‍या बुलेटवर कारवाया करण्याचा सपाटा लावला असून, याद्वारे जप्त करण्यात आलेले सायलेन्सर, प्रेशर हॉर्न्स यावरुन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर फिरवण्यात आला.

    सातारा : सातारा वाहतूक शाखेने शहरात फटाके फोडणार्‍या बुलेटवर कारवाया करण्याचा सपाटा लावला असून, याद्वारे जप्त करण्यात आलेले सायलेन्सर, प्रेशर हॉर्न्स यावरुन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर फिरवण्यात आला.

    सातारा शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. मात्र काही तरुणाईमुळे या शहराची शांतता धोक्यात येत होती. बुलेटला फटाके फोडणारे सायलेन्सर बसवणे, प्रेशर हॉर्न्स याबरोबरच काहींनी पोलिसांच्या सायरन सारखे हॉर्न बसवले होते. त्यामुळे शहरातील शांततेला गालबोट लागत होते. याबाबत सातारा शहरातील अनेक नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी आपल्या संपूर्ण टीमला अशा वाहनांवर कारवाया करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.

    त्यानुसार वाहतूक शाखेने ५६ पेक्षा अधिक वाहनांवर कारवाया करुन ५६ सायलेन्सर, १० पोलीस सायरनसारखे आवाज करणारे हॉर्न्स, ५ पेक्षा जास्त प्रेशर हॉर्न्स जप्त केले. या जप्त केलेल्या मालाला सातार्‍यात पहिल्यांदाच बुलडोझरखाली चिरडून निरुपयोगी करण्यात आले. या कारवाईमुळे सातारा शहरवासियांनी वाहतूक शाखेचे अभिनंदन केले आहे.

    दिवसाच नाहीतर रात्रीही कारवाई

    वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव म्हणाले, सातारा शहरात नियमांचे उल्लंघन, वाहनांना मॉडिफाय करण्याच्या नावाखाली वाहनाचा आवाज बदलणे, रेसिंग लावणे अशी कृत्ये आढळून आल्यास दिवसाच नाहीतर रात्रीही वाहतूक शाखा अशा वाहनांवर कायम कारवाई करणार आहे.