बंदुकीतून गोळी सुटली अन् घराच्या खिडकीत घुसली; कोथरूडमधील घटना

कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीत एका इमारतीच्या फ्लॅटच्या गॅलरीच्या काच फोडत बंदुकीतील गोळी घरात घुसली. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

    पुणे : कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीत एका इमारतीच्या फ्लॅटच्या गॅलरीच्या काच फोडत बंदुकीतील गोळी घरात घुसली. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल टॉवर्स उजवी भुसारी कॉलनी येथे आहे. तेथे चौथ्या मजल्यावर विनय देशमुख यांचा फ्लॅट आहे. त्यांनी त्यांचा फ्लॅट भाडेतत्वावर दिला आहे. मंगळवारी दुपारी भाडेकरू घरात असताना त्यांच्या गॅलरीच्या काचेच्या दरवाजावर मोठा दगड मारल्याचा आवाज झाला.

    हा आवाज ऐकून घरातील लोक गॅलरीकडे पळाले. त्यावेळी त्यांना काच फुटल्याचे व घरात काचा विखुरल्याचे दिसले. त्याबरोबर पिस्तुलाची गोळी (काडतुस) त्यांना दिसली. भाडेकरूंनी तात्काळ सोसायटी व घरमालक यांना माहिती दिली. यानंतर कोथरूड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

    अधिक माहिती घेताना या इमारतीच्या समोरच डोंगर असून, डीआरडीओकडून फायरींगचा सराव सुरू असताना ही गोळी आली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये कोणताही घातपाताचा प्रकार नसल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले.