लग्नाच्या आमिषाने शारिरीक संबंध अन् लग्न मात्र दुसरीशी; नाशिकच्या तरुणावर पुण्यात गुन्हा दाखल

एकाच बँकेत नोकरी करत असताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीनंतर त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले. परंतु, ऐनवेळी दुसऱ्याच मुलीशी लग्न करत त्या तरुणीला धोका दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : एकाच बँकेत नोकरी करत असताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीनंतर त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले. परंतु, ऐनवेळी दुसऱ्याच मुलीशी लग्न करत त्या तरुणीला धोका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आता नाशिकमधील तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.
    याप्रकरणी नाशिकमधील कृष्णा भरत जाधव (वय ३२, रा. आडगाव शिवार, पंचवटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करत होते. तेव्हा दोघांची ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. या दरम्यान, तरुणीला पुण्यात नोकरी लागली. यामुळे ती नाशिक सोडून पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर देखील कृष्णा तिला भेटण्यास पुण्यात येत असत. त्याने तरुणीला तु खूप आवडतेस, तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगत तिच्याशी शारिरीस संबंध निर्माण केले. वारंवार तो पुण्यात येऊन तरुणीला भेटत होता. त्याने अनैसर्गिक अत्याचार देखील केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
    तसेच, याबाबत कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करून मारून टाकीन अशी धमकीही त्याने दिली होती. दरम्यान कृष्णाने अचानक दुसऱ्याच एका तरुणीशी विवाह केला. ही बाब तरुणीला समजली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घोरपडे हे करत आहेत.