आमदार रवींद्र धंगेकरांना महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं भोवलं; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपुर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती.

  पुणे : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपुर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती.

  याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगर भागात आशानगर येथे महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी टाकी बांधण्यास पाठपुरावा केला होता. पण, टाकीच्या उद्घाटनाचे श्रेय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्ते तेथे जमले.

  धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शिवीगाळ करून धमकावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला. याचा निषेध महापालिका अधिकाऱ्यांनी केला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही धंगेकर यांच्यावर टीका केली होती. मात्र, दोन दिवसात याबाबत पालिकेकडून तक्रार दाखल केली नव्हती. सोमवारी रात्री जगताप यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

  आमदारच असे वागू लागले…

  ससून रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमात बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला कानाखाली मारली होती. त्यानंतर कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यापुर्वी नदीतील जलपर्णी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप धंगेकर यांनी करत महापालिका अतिरिक्त आयुक्तांना चप्पल फेकून मारली होती. याप्रकरणी धंगेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा धंगेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. शहरात आमदारच असे वागू लागल्याने शांतताप्रिय पुण्याच्या स्थितीचे तीन तेरा वाजले आहेत.