
१६ एप्रिल रोजी आजी आपल्या नातीला घरी ठेवून फुलसावंगी येथे लग्नाला गेली होती. लग्नानंतर आजीने घरी येऊन पाहिले असता तीची नात तीला घरी दिसली नाही. त्यामुळे, तीने तीच्या नातेवाइकांकडे याची चौकशी केली असता तिचे लग्न लावून दिले असून ती पुणे येथे नवऱ्या मुलासोबत गेली असल्याची माहिती मिळाली.
यवतमाळ : वडीलांचे छत्र हरवलेल्या आणि आजीकडे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न तीच्या आजीला न सांगता काही नातेवाइकांनी परस्पर लावून दिले आहे. या प्रकरणात आजीने दिग्रस पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून आजीच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी चार नातेवाइकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
मुलीचे वडील आजारपणाने दगावल्याने आपल्या वडिलांच्या आई म्हणजेच आजीकडे राहत होती. त्यावेळी त्या मुलीची आई तिच्या छोट्या भावाला घेऊन तिच्या घरी राहण्यास गेली होती. अशात १६ एप्रिल रोजी ती आजी आपल्या नातीला घरी ठेवून फुलसावंगी येथे लग्नाला गेली होती. लग्नानंतर आजीने घरी येऊन पाहिले असता तीची नात तीला घरी दिसली नाही. त्यामुळे, तीने तीच्या नातेवाइकांकडे याची चौकशी केली असता तिचे लग्न लावून दिले असून ती पुणे येथे नवऱ्या मुलासोबत गेली असल्याची माहिती मिळाली. यावर तिचे लग्न मला न विचारता कसे काय लावले, असा जाब आजीने विचारला. त्यावर त्या नातेवाईकाने तुम्हाला काय करता येईल ते करा असे म्हटले.
त्यावरुन आजीने थेट दिग्रस पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित बालविवाह करणारे नातेवाईक सागर क्षीरसागर, कांचन क्षीरसागर, रेखा क्षीरसागर रा. दिग्रस आणि मंगेश डहाके रा. महागाव कसबा, ता. दारव्हा या चौघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९, १० व ११ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांच्या मार्गदर्शनात विशाल बोरकर करत आहे.