नूपुर शर्मा यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोहम्म्द पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : मोहम्म्द पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान युनूस शेख (वय 33, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात समाजात जातीय तेढ निर्माण करून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. शर्मा यांच्या वक्तव्यामुळे जगभरात हिंदुस्थानची प्रतिमा मलीन झाली आहे. जगभरात या घटनेचा निषेध नोंदवला आहे. शर्मा यांच्या या बेताल विधानामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    दरम्यान त्यानुसार, नूपुर शर्मा यांच्या विरोधात कलम 153 (ए), 153 (ब), 295 (अ) आणि 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.