पुणे-नगर रस्त्यावर वायूगळती प्रकरणी टँकरचालकावर गुन्हा

    पुणे : पुणे-नगर-रस्त्यावर वडगाव शेरीत रासायनिक पदार्थांची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन झालेल्या वायू गळतीप्रकरणी टँकरचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या वायूगळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. १७ तासानंतर तो टँकर रस्त्यावरून बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले होते.

    निष्काळजीपणे टँकर चालवून मानवी जीवितास धोका

    याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात राजाराम दुबरी वर्मा (वय ५१, रा. जयनगर, ता. फैजाबाद, जि. अयोध्या) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस शिपाई साईनाथ म्हस्के यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. निष्काळजीपणे टँकर चालवून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनी

    रायगड जिल्ह्यातील नागोठाणे भागात रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनी आहे. तेथून इथिलिन ऑक्साइड वायू घेऊन हा टँकर धाराशिव येथील बालाजी कंपनी येथे निघाला होता. तेव्हा नगर रस्त्यावर वडगाव शेरी येथे रविवारी मध्यरात्री टँकर उलटलून वायूगळती झाली. अग्निशन दलाच्या जवानांनी धोका विचारात घेऊन टँकरवर सलग पाण्याचा मारा सुरू ठेवला होता. टँकरमध्ये इथिलिन ऑक्साइड हा वायू होता. तो ज्वलनशील असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

    दुकानदारांना सतर्कतेचा इशारा

    टँकर उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती कौशल्य पणाला लावून हाताळली. टँकर उलटल्याने ३ किलोमीटरच्या परिसरातील रहिवासी, उपाहारगृहचालक, दुकानदारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अपघातानंतर नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती. परंतु, काही काळ रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

    स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली

    टँकरमधील १६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वायूगळती रोखण्यात यश आले. वायूगळती रोखताना पुरेशी काळजी घेतली गेली होती. ती घेतली नसती तर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. सोमवारी दुपारी अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे तंत्रज्ञ घटनास्थळी भेट दिली होती. टँकरमध्ये ज्वलनशील वायू होता. टँकर भरधाव वेगाने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.