बेदरकार वाहन चालवून धिंगाणा घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

जाब विचारणाऱ्या इतर गाडी चालकांना बाटली फेकून, धमकी दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या टोळक्यावर एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    नवी मुंबई : नवी मुंबईतील रस्त्यावर एका टोळक्याने एकाच आठवड्यात दोन वेळा बेदरकार चारचाकी वाहन हाकल्याचा व्हिडिओ व्ह्यारल झाला आहे. यात हे टोळके चालत्या गाडीवर फटाके ठेवून उडवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या वेळेस गाडीतून बाहेर वाकून आरडाओरड करताना तसेच टोळक्याने नागरिकांच्या गाड्या अडवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. जाब विचारणाऱ्या इतर गाडी चालकांना बाटली फेकून, धमकी दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या टोळक्यावर एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    नयन पाटील आणि वंश मिश्रा अशी त्यांची नावे आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 22 जानेवारी व 29 जानेवारी 2024 असे एकाच आठवड्यात दोन वेळा टोळक्याकडून नवी मुंबईतील रस्त्यांवर हैदोस घातला गेल्याचे दिसून आले. मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे देखील एकंदरीत वाटत आहे. 22 जानेवारी रोजी गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी करत बेदरकारपणे वाहन चालवले त्यामुळे कधीही आणि कोठीही आगीच्या घटना घडू शकली असती. तर 29 जानेवारी रोजी एका वाहन चालकाला थांबवून, शिवीगाळ करून त्यांचे वाहन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा चित्रफीती समाज माध्यमांवर फिरत आहेत. या दोन्ही घटनांत सर्व सामान्य वाहन चालकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला गेला.

    मात्र यातील 22 तारखेची घटना 29 तारखेला दाखवून गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा आहे. तसेच दाखल गुन्ह्यात ज्या फॉर्च्युनर वाहनाचा उल्लेख केला आहे. ती गाडी आरोपी नयन पाटीलची नसून त्यांची हेक्टर गाडी आहे असे स्थानिक नागरिकांकडून समजते. त्यामुळे 29 जानेवारी रोजी जो व्यक्ती फॉर्च्युनर गाडीतून हैदोस घालत होता त्यास गुन्ह्यातून वगळून मुख्य आरोपीस पोलिसांनी वाचवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.