मुख्यमंत्र्यांचे डुप्लिकेट विजय मानेवर पुण्यात गुन्हा दाखल, गुन्हेगारासोबत फोटो काढणं भोवलं

त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत काढलेला फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या फोटोवरुन वादंग उठलं असून या प्रकरणी त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्यासारखे हुबेहुब दिसणात म्हणून पुण्यातील विजय माने ( Vijay Mane) गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. आता पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. सऱ्हाईत गुन्हेगारासोबत फोटो काढणं मख्यमंत्र्यांच्या या डुप्लिकेटला चांगलच भोवलं आहे. या प्रकरणी विजय माने विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

    विजय नंदकुमार माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे दिसतात. त्यांच्यासारखे दिसत असल्यामुळे सोशल मिडियावर ते कायम चर्चेत असतात. मुख्यंमत्र्यांसारखा पेहराव करुन काढलेला एक फोटो त्यांचा गेल्या काही दिवसापासून समोर येत आहे. अशातच त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत काढलेला फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या फोटोवरुन वादंग उठलं असून या प्रकरणी त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तर, याबाबत विजय मानेनं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं असून ‘मी स्व:ता भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होईल असं काम माझ्याकडून होणं शक्य नाही. काही मागण्यांबाबत पोलिसांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती होता मात्र, तो गुन्हेगार असल्याची मला कल्पना  नव्हती. मी फक्त तिथं उपस्थित असलेल्यां म्हणणं ऐकत उभा होतो. त्यावेळी कुणी माझा फोटो काढला आणि व्हायरल केला याची कल्पना नाही”, असं म्हण्टलयं.