महिलेला फसवून लग्न लावले अन्…; मध्यस्ती इसमासह पती व सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका महिलेचे मध्यस्ती इसमाने फसवणूक करुन लग्न करुन दिले मात्र त्यांनतर महिलेचे पती व सासू सासऱ्यांनी महिलेचा छळ केल्याची घटना घडली आहे.

    शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका महिलेचे मध्यस्ती इसमाने फसवणूक करुन लग्न करुन दिले मात्र त्यांनतर महिलेचे पती व सासू सासऱ्यांनी महिलेचा छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शाम बबन मुंजाळ, मल्हारी राजू चाटे, राजू दशरथ चाटे, व वेणूबाई राजू चाटे यांच्या विरुद्ध फसवणूक तसेच महिलेच्या शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रांजणगाव गणपती येथील महिलेला लग्नाची मध्यस्ती करणाऱ्या शाम मुंजाळ या इसमाने ज्योती चाटे यांना मल्हारीचे शिक्षण जास्त झालेले असून, त्याची स्वतःची शेती आहे तसेच वर्क शॉप असल्याचे सांगून लग्न लावून दिले, त्यांनतर महिलेचे पती व सासू सासरे यांनी तुला घरातील कामे येत नाही, लग्नात हुंडा दिला नाही असे बोलून मारहाण करत घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आण असे म्हणून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

    दरम्यान त्यानंतर महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत आपपल्या आई वडिलांना सांगीतले. याबाबत ज्योती मल्हारी चाटे (वय २८ वर्षे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी लग्नाचा मध्यस्ती शाम बबन मुंजाळ (रा. मुंजाळवाडी कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे) पती मल्हारी राजू चाटे, सासरे राजू दशरथ चाटे, व सासू वेणूबाई राजू चाटे सर्व (रा. शिरापूर ता. पारनेर जि. अहमदनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार विद्या बनकर या करत आहेत.