पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

आमदार सुनील कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हात उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे :  काल ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी वादंग निर्माण झाला होता.उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये हात उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणी भाजप (BJP) आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुनील कांबळे यांची नाराजी

    ससून रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. मात्र यावेळी कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले. त्यामुळे मंचावर न थांबता ते निघून जात होते. खाली उतरत असताना आमदार कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला. या प्रसंगाआधी देखील त्यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासोबत बाचाबाची झाली होती. घडलेल्या या सर्व प्रकारामुळे आमदार सुनील कांबळे यांच्या जोरदार टीका करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आंदोलन देखील करणार आहे, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घडला प्रकार

    ससून रुग्णालयामध्ये तृतीय पंथी लोकांसाठी विशेष वॉर्ड उभारण्यात आला, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे, आमदार रवींद्र धंगेकर, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांच्यासह आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.