मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या होत्या. या यात्रेदरम्यान २३ जानेवारी रोजी वाघोली येथे त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभाही पार पडली होती.

    याठिकाणी मनोज जरांगे यांची पहाटे तासभर सभा झाली होती. यादरम्यान, आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील लोणीकंद पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह ८- १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. बीडमध्ये ही सभा होणार आहे.