रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्य़ात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं कारण?

सहकार नगर येथील पोलीस चौकी बाहेर धंगेकर यांनी भाजप विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता हे आंदोलन केल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : पुण्यातील लोकसभा मतदारसंघाचे मतदान काल (दि.13) पार पडले. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. तसेच सहकार नगर येथील पोलीस चौकी बाहेर धंगेकर यांनी भाजप विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता हे आंदोलन केल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते. बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी जो कायदा व सुव्यवस्था बिघडवेल त्यावर गुन्हा दाखल होईल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या एक दिवसआधी म्हणजे 12 मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले होते. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम 143, 145, 149, 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135, लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घोषणा देऊन वरील आदेशाचे उल्लंघन करणे यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.