पाळीव प्राण्यांसाठी मुंबईत स्मशानभूमी उभारणार; येणार १५ लाख रुपये खर्च

मुंबईतील रस्त्यावर अनेकवेळा मुकी जनावरे, पाळीव प्राणी मृत अवस्थेत पडलेली दिसतात. अशा प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत काही खासगी स्मशानभूमी उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी अशा प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

    मुंबई : दहिसर (Dahisar) येथील अडीच हजार सेक्वेअर फुटाच्या जागेवर पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी (Cemetery For Pets) बांधण्याचा निर्णय महापालिकेने (BMC) घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक शवदाहिनी (Electronic Crematorium) असल्याने प्रदूषण होणार नाही. तसेच जुन्या पद्धतीने त्यावर धुरांडाही असणार आहे. या स्मशानभूमीसाठी १५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली.

    मुंबईतील रस्त्यावर अनेकवेळा मुकी जनावरे, पाळीव प्राणी मृत अवस्थेत पडलेली दिसतात. अशा प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत काही खासगी स्मशानभूमी उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी अशा प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मुंबईत पाळीव प्राण्यासाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या एका टोकाला असलेल्या दहिसरमध्ये प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे निश्चित झाले आहे, असे महापौरांनी सांगितले.

    मुंबईत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासगी स्मशानभूमी आहेत. मात्र येथे अनेक अडचणी आहेत. येथे अंत्य़संस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागते. घरातले सदस्याप्रमाणे प्राण्यांचे पालन करतो. त्यांच्या जाण्याच्या दुःखात असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात खूप वेळ जात असेल तर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे दहिसर येथे पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारली जाणार आहे, असल्याचे महापौर म्हणाल्या. उभारली जाणारी स्मशानभूमी कशा पद्धतीने उभारली जाणार आहे, याच्या मॉडेलचे महापौरांनी पत्रकार परिषदेत सादरीकरण केले. यात इलेक्ट्रॉनिक शवदाहिनी असणार आहे. तसेच त्यावर जुन्या पद्धतीने धुरांडा असणार आहे, असे महापौरांनी सांगितले.