
उच्चभ्रु भागातील मोठमोठ्या हॉटेलात दिवसा ‘शेफ’ म्हणून नोकरी अन् रात्र झाली की घरफोडी, अशी किमया साधणाऱ्या त्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुणे : उच्चभ्रु भागातील मोठमोठ्या हॉटेलात दिवसा ‘शेफ’ म्हणून नोकरी अन् रात्र झाली की घरफोडी, अशी किमया साधणाऱ्या त्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
फुरकान नईम खान (वय २१, रा. हरियाना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चंदननगर पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे व त्यांच्या पथकाने केली आहे. चंदननगर परिसरातील एक कंपनीत चोरी झाली होती.
३ लाख ७ हजारांचा ऐवज जप्त
कंपनीतून परकीय चलन व इतर ऐवज असा ३ लाख ७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषणातून माहिती घेतली. तेव्हा फुरकान खान याच्याबाबत माहिती मिळाली. त्याचा शोध घेताना पोलिसांना तो पिंपरी-चिंचवड येथे मिळून आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
अधिक तपासात त्याने खराडीमधील एक सॅमसंग गॅलरी देखील फोडल्याची कबूली दिली. त्याच्याकडून परकीय चलनातील रक्कम जप्त केली आहे. तो एका हॉटेलात शेफ म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुंढवा भागातील एका हॉटेलात तो दिवसा शेफ म्हणून नोकरी करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.