लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका, पुण्यातील घटना

लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकला होता. जवळपास २० मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली.

    पुणे : लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकला होता. जवळपास २० मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याचा फोन आला होता. अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आल्या.

    घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा सहा मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवला.

    लिफ्ट रुममधे जाऊन तांत्रिकरित्या काम पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची २० मिनिटात सुखरुप सुटका केली.

    सुटका होताच तेथील रहिवाशांनी जवानांचे आभार मानले. या कामगिरीत अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक अतुल मोहिते, प्रशांत मखरे, तांडेल मंगेश मिळवणे व फायरमन चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, ओंकार बोंबले, अमर दिघे, केतन नरके यांनी सहभाग घेतला.