संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अंबाझरीच्या शिवाजीनगर सिमेंट रोडवरील सायक्लॉन पबमध्ये (Cyclone Pub) शनिवारी रात्री प्रवेशावरून बाऊन्सरचा काही लोकांशी वाद झाला. बाऊन्सरने उपद्रवींना चांगला चोप दिला. याचा बदला घेण्यासाठी उपद्रवींनी त्यांच्या कारमधून तलवार आणि पिस्तूल काढली.

    नागपूर : अंबाझरीच्या शिवाजीनगर सिमेंट रोडवरील सायक्लॉन पबमध्ये (Cyclone Pub) शनिवारी रात्री प्रवेशावरून बाऊन्सरचा काही लोकांशी वाद झाला. बाऊन्सरने उपद्रवींना चांगला चोप दिला. याचा बदला घेण्यासाठी उपद्रवींनी त्यांच्या कारमधून तलवार आणि पिस्तूल काढली. यामुळे काही वेळासाठी तेथे दहशत पसरली होती. याची माहिती मिळताच डीसीपी मुमक्का सुदर्शनसह मोठ्या संख्येत पोलिस घटनास्थळावर पोहोचले. मात्र, पोलिसांनी केवळ तलवार निघाल्याची पुष्टी केली.

    याप्रकरणी पोलिसांनी प्रिया संतकुमार ठाकुर (वय 38, रा. ओंकारनगर) च्या तक्रारीवरून तीन आरोपींवर आर्म्स अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. देवेंद्र मधुकर टिकले (वय 41, रा. अशोक चौक, वैशालीनगर), सरबजीतसिंग सुरजीतसिंग ओबेरॉय (वय 41 रा. बाबा बुढ्ढाजीनगर) आणि हॅप्पीसिंग प्रदीपसिंग मटारू (वय 35, रा. बुद्धनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

    शिवाजीनगरच्या सिमेंट रोडवर वेद सॉलिटेअर बिल्डिंगमध्ये प्रियाचे सायक्लॉन पब लाऊंज आहे. याच इमारतीच्या 20 व्या माळ्यावर रास्ता नावाचे पब ही आहे. सांगण्यात येते की, आरोपींनी वर्धा मार्गावरील एका पबमध्ये दारू ढोसली. त्यानंतर रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ते रास्ता लाऊंजध्ये गेले. आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे तेथील बाऊन्सरने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. आरोपी नाराज होऊन खाली आले आणि सायक्लॉनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. येथे ही बाऊन्सरने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. यामुळे चिडून आरोपींनी प्रवेश काऊंटरला लाथ मारली आणि शिवीगाळ करू लागले.

    प्रियाने त्यांना जाब विचारला असता आरोपींनी धमकावले. सायक्लॉनच्या बाऊन्सर्सनी तिघांनाही चांगला चोप दिला. सरबजीतला काठीने बदडले. त्याने त्याच्या खास वाडे बंधूंना फोन करून मदतीसाठी बोलावले. या दरम्यान सरबजीतने कारमधून तलवार काढली. त्याने खिशात एक पिस्तूलही ठेवली. त्याला वाहनातून शस्त्र काढताना पाहून सर्व बाऊन्सरमध्ये पळापळ सुरू झाली. काहीजण आरोपींच्या हाती लागले. आरोपींनी त्यांना जबर मारहाण केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.